घट्ट आणि टाईट कपडे घालताय तर आताचं सावध व्हा.. अन्यथा हे परिणाम होऊन आपण कधीच आई वडील बनू शकणार नाही…घट्ट कपड्यांचे परिणाम

जुन्या काळाच्या चित्नपटातल्या नायिका बघताना त्यांचे कपडे हा विषय मला कुतूहलाचा वाटायचा. स्किन फिट कपडे घालून नृत्य करणा-या या नायिकांना बघून वाटायचं की एवढे घट्ट कपडे त्यांच्या अंगावर कसे बरं चढत असतील. बहुधा अंगावरच शिवले असावेत का? असं वाटायचं.

पण हे कुतूहल अजूनही शमलं नाही. कारण काळ बदलला, फॅशन बदलली तरी घट्ट कपड्यांची हौस आजही तशीच असल्याचं दिसतं. हल्ली घट्ट कपडे हे जीन्स, टॉप्स आणि इतरही अनेक प्रकारात मिळतात की बघून आपणच अस्वस्थ व्हावं!  हे असे कपडे घालून त्रास होत नसेल का? गरम होत नसेल का, असे प्रश्न पडतात. बरेचदा तर वजन जास्त असणा-या  मुली, महिलाही टाइट जीन्स, टॉप्स, स्कर्ट्स घालतात.

हे कपडे शोभून दिसतात की नाही, हा प्रश्न वेगळा; पण हे कपडे त्यांच्यासाठी आरामदायी नाही हे पाहणार्‍यालाही लक्षात येतं. फॅशन म्हणून कोणी, कुठलेही कपडे वापरू शकतो. पण टाइट कपड्यांची फॅशन आरोग्यदृष्ट्या कितपत योग्य आहे हे तपासणंही गरजेचं आहे.

मुळात कपडे हे फॅशनसाठी घातले जात नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्या त्या ऋतूमध्ये आपलं शरीर, त्वचा यांचं संरक्षण करणं हा कपडे वापरण्याचा मूळ उद्देश आहे. म्हणून आपण उन्हाळ्यात कॉटनचे,

शीतल रंगाचे कपडे वापरतो आणि हिवाळ्यात जाड, अंगभर, लोकरीचे कपडे वापरतो. कारण हे कपडे हा घटक केवळ दिसणं किंवा फॅशन याच्याशी संबंधित नसून आरोग्याशी निगडित आहे. आपली त्वचा हा एक सर्वात मोठा शरीरभर पसरलेला, व्यापक अवयव आहे.

त्वचा हे महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. त्याचबरोबर नको असलेलं मल, विषार शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं मोठं काम त्वचा करते. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम करते. त्यासाठी उन्हाळ्यात त्वचेवरील रंध्रं उघडली जातात,

मोठय़ा प्रमाणात घाम शरीराबाहेर टाकला जातो आणि शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हीच रंध्रं हिवाळ्यात बंद करून घेतली जातात आणि उष्णता शरीरातच रोखून धरली जाते. या सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित आणि नैसर्गिक पद्धतीनं चालू राहायच्या असतील तर त्वचा मोकळी हवी ! त्वचेमधून वायुविजन व्हायला जागा हवी!

ट्ट कपड्यांचे परिणाम:-
बरेचदा आपण इतरांचं अनुकरण म्हणून एखादी गोष्ट किंवा फॅशन फॉलो करतो. पण त्याचे कधी कधी अतिशय गंभीर दुष्परिणाम असू शकतात हे आपल्या गावीही नसतं! स्री  आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर घट्ट कपड्यांचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

काही परिणाम सर्वसामान्य  आहेत जसे की पोटावर अतिशय घट्ट बसेल अशी जीन्स दिवसभर घातल्यानं पोट सतत दाबलं जातं आणि दुखू शकतं. खाल्लेलं अन्न घशाशी येतं. गॅसेस होतात. पायांवर, पोट-यावर सूज येते. पायाच्या शिरांमधील रक्तप्रवाह बाधित होऊन शिरा फुगतात आणि व्हेरिकोज व्हेन्सची समस्या निर्माण होऊ शकते.
अतिघट्ट कपडे घातल्यानं मांडीमधील मज्जातंतूवर दाब पडून स्नायू दुखणं, पायांना मुंग्या येणं, पाय बधीर होणं, पायात पेटके/क्रॅम्प्स येणं या तक्रारी जाणवतात.

पुरुषांमध्ये घट्ट जीन्समुळे प्रजोत्पादन अवयवांच्या जवळ सतत उष्णता वाढलेली राहिल्यामुळे शुक्र जंतूंची निर्मिती कमी होऊ शकते जी पुढे जाऊन वंध्यत्वाचं कारण  ठरू शकते. खूप घट्ट पॅन्ट किंवा आतले कपडे वापरल्यामुळे टेस्टीज पिरगळल्या जाऊ शकतात, कधी कधी आत घडणारी ही गोष्ट लवकर लक्षात येत नाही आणि शुक्रजंतूंची निर्मिती करणार्‍या ग्रंथींचा (टेस्टीज) रक्तपुरवठा पूर्ण बंद होऊन ती टेस्टी मृतवत होऊन जाते. हा अत्यंत गंभीर परिणाम आहे.

घट्ट कपडे घातल्यानं घाम खूप जास्त येतो. त्वचेची रंध्रं गुदमरल्यासारखी होतात. कंबर आणि त्या खालील नाजूक प्रजोत्पादक अवयव सतत दबलेले राहातात आणि तेथील तापमानही गरजेपेक्षा खूप जास्त राहातं.

अशा उष्ण वातावरणात अनेक जंतू आक्र मण करू शकतात. विविध प्रकारचे बॅक्टेरिया तेथे फोफावतात. विशेषत: जननांगाभोवती सतत दमट हवा राहिल्यानं फंगल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कित्येक पट वाढते. खाज येणं, आग होणं, लाल चट्टे/पुरळ येणं हे तर होतंच, पण हाच जंतूसंसर्ग स्त्रियांच्या बाबतीत योनिमार्गातदेखील पसरू शकतो.

स्त्रियांमध्ये ओटीपोटावर येणारा अतिरिक्त ताण किंवा दाब यामुळे गर्भाशयाशी संबंधित अनेक तक्रारी उद्भवतात. त्यांनाही वंध्यत्वासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी-अधिक होणं पोट खूप दुखणं, कंबर, मांड्या यातून चमका निघणं हे,

त्रास जाणवतात; परंतु बरेचदा हा त्रास घट्ट कपडे घातल्यामुळे होतोय हे लक्षातही येत नाही. घट्ट टॉप किंवा लिंगरी घातल्यामुळे खांदे, मान, पाठ दुखणं, स्तनांमध्ये वेदना होणं, जडपणा येणं ही लक्षणंही दिसतात.

गर्भवती स्रियांनी आतील कपडे घट्ट घातल्यामुळे पोटावर वळ पडणं, पोट आवळून आल्याप्रमाणे घट्ट वाटणं हे  त्रास होतात. गर्भवती अवस्थेत पोटाचा घेर वाढलेला असतो.  त्याचबरोबर पूर्ण शरीरात रक्तप्रवाह वाढलेला असतो. त्यावर घट्ट कपडे घातल्यानं परिणाम होतो.  स्तनांचा आकारही वाढलेला असतो, पुढे जन्माला येणा-या बाळाच्या पोषणाची तयारी सुरू असते. अशा अवस्थेत घट्ट कपडे वापरल्यास स्तनांना सूज येणं, लालीमा येणं, दुखणं, स्पर्श सहन न होणं ही लक्षणं दिसतात.

हे सगळं वाचल्यावर असं लक्षात येईल की सहज फॅशन म्हणून, स्टाइल म्हणून वापरात असलेले कपडे आपल्या स्वास्थ्यावर  गंभीर परिणामही करू शकतात. कपडे खरेदी करताना केवळ फॅशन इतका एकच फॅक्टर लक्षात न घेता ते आपल्या शरीरासाठी हितकारक आहेत की नाही याचाही विचार करायला हवा.


Posted

in

by

Tags: